
भोर/पुणे (जनमंथन वृत्तसेवा) : शिक्षण ही उज्वल भविष्याची गुरुकिल्ली आहे, परंतु दुर्गम ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांसाठी मूलभूत शालेय साहित्याचा अभाव हा त्यांच्या शिक्षणात अडथळा ठरू शकतो. शैक्षणिक संसाधनांची हीच गरज जाणून घेऊन, पुण्यातील मैत्रक चॅरीटेबल फौंडेशनच्या वतीने महाराष्ट्रातील भोर तालुक्यातील अतिदुर्गम अशा ग्रामीण खेड्यांतील १६ शाळांमध्ये शिकणाऱ्या सुमारे ४०० विद्यार्थ्यांना अत्यावश्यक वस्तूंनी भरलेली दप्तरे दान करण्याचे हृद्यस्पर्शी पाऊल उचलले.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि अतिरिक्त गरजा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक दप्तरांमध्ये कंपास बॉक्स, वह्या, रंगपेटी, ड्रॉईंग बुक, एक शब्दकोश आणि एक रेनकोट अशा वस्तू होत्या. नवीन दप्तरे आणि इतर वस्तूंमुळे मुलांमध्ये उत्साह निर्माण झाला असून, त्यांना नियमितपणे शाळेत जाण्यासाठी आणि त्यांच्या अभ्यासात अधिक सक्रियपणे सहभागी होण्यासाठी निश्चितच प्रोत्साहन मिळाले आहे.
मैत्रकने एका शाळेला प्रोफेशनल टेलिस्कोप दुर्बिणही दान केली आहे. सुंदर तलाव, डोंगर आणि जंगलाच्या निसर्गसौंदर्याने नटलेल्या गावाजवळ राहणाऱ्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना पक्षी शोधण्यासाठी आवश्यक असलेले साधन मैत्रकने पुरवले आहे. सर्वांगीण शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांचे संवर्धन हेच मैत्रकचे ध्येय आहे.
या कार्यक्रमाला नरेंद्र चिप्पा, मनोज भंडारे, डॉ. तुषार शितोळे, विनय अरुंदेकर, आरती परांजपे, अनिता देशपांडे, शशिकांत सातव, अभय कुलकर्णी हे मैत्रकचे सदस्य आणि भोर येथील सामाजिक कार्यकर्ते राजीव केळकर उपस्थित होते.