पुण्यातील तिहेरी हत्याकांडाने खळबळ; गर्भपातादरम्यान मृत्यू झालेल्या महिलेसह तिच्या दोन्ही जिवंत लेकरांना नदीत ढकलले
बेपत्ता असलेल्या महिलेच्या शोधादरम्यान या संपूर्ण घटनेचा झाला उलगडा; आरोपी प्रियकरास अटक
पुणे (जनमंथन वृत्तसेवा) : पुण्याच्या मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे परिसरातील तिहेरी हत्याकांडाची घटना उघडकीस आल्याने संपूर्ण पुणे शहरात खळबळ माजली आहे. एका महिलेचा गर्भपातादरम्यान मृत्यू झाला होता. त्यामुळे पुरावा नष्ट करण्यासाठी मृत महिलेचा मृतदेह नदीत टाकताना तिच्या दोन मुलांनी आरडाओरडा केली. यामुळे तिच्या दोन मुलांनाही आरोपींनी नदीत ढकलल्याची संतापजनक घटना घडली आहे.
ही घटना दि. ६ ते ९ जुलै दरम्यान तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. बेपत्ता महिलेचा शोध घेताना ही संपूर्ण घटना समोर आली आहे.
याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीना अटक करण्यात आली आहे. आरोपी प्रियकर गजेंद्र दगडखैर आणि त्याचा मित्र रविकांत गायकवाड अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात विवाहित महिला बेपत्ता असल्याची मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरु केला. या तपासात बेपत्ता महिलेच्या प्रियकराने तिचा ग
र्भपात करण्यासाठी तिला आपल्या मित्रासोबत ठाणे येथे पाठविले होते. ठाण्यातील रुग्णालयात उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला.
त्यानंतर प्रियकराच्या मित्राने मृत महिलेला आणि तिच्या दोन्ही मुलांना परत घेऊन येत असताना तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ९ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास प्रियकराने आणि त्याच्या मित्राने मदतीने महिलेचा मृतदेह नदीत फेकून दिला.
या प्रकारांमुळे दोन्ही मुलांनी टाहो फोडला. यावेळी आरोपींनी मुलं रडतात म्हणून त्यांनाही जिवंतपणे नदीत ढकलले. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास तळेगांव एमआयडीसी पोलीस करीत आहे.