पिंपरी (जनमंथन वृत्तासेवा) : निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उपायुक्त अजय चारठाणकर आणि मिनीनाथ दंडवते यांची बदली करण्यात आली. नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी-छापवाले यांनी आदेश काढला आहे.
समाज कल्याण विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर महापालिकेत ऑगस्ट 2020 ला रुजू झाले होते. महापालिकेत रुजू झाल्यानंतर समाजविकास तसेच आरोग्य विभागाचेही त्यांनी कामकाजही सांभाळले होते.
उपायुक्त मिनीनाथ दंडवते 13 जुलै 2023 ला महापालिकेत उपायुक्त म्हणून रुजू झाले होते. यांनी यापूर्वी महापालिकेत सहायक आयुक्त म्हणूनही कामकाज केले आहे. सध्या त्यांच्याकडे क्रीडा व जनसंपर्क विभागाचा पदभार होता.
लोकसभा निवडणुकीमुळे शहरातील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार दोघांची बदली झाली आहे. या बदलीचा आदेश काढताना त्यांना दुसऱ्या ठिकाणी देण्यात येणाऱ्या पदस्थापनेबाबत स्वतंत्र आदेश काढण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.