
पुणे (जनमंथन वृत्तसेवा) : शहरातील सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयात (ए.एफ.एम.सी.), दि. १८ मार्च २०२४ रोजी आयोजित समारंभात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, पी.व्ही.एस.एम., यू.वाय.एस.एम., ए.व्ही.एस.एम., एस.एम., व्ही.एस.एम. यांच्या हस्ते देशातील प्रमुख वैद्यकीय महाविद्यालयांपैकी एक असलेल्या सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयाला युनिट प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
दि. १ जुलै २०२२ ते ३० जून २०२३ या कालावधीत दाखवलेल्या असामान्य वचनबद्धतेसाठी आणि दिलेल्या अनुकरणीय सेवांसाठी हे प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आले आहे. ए.एफ.एम.सी. चे संचालक आणि कमांडंट लेफ्टनंट जनरल नरेंद्र कोतवाल, ए.व्ही.एस.एम., एस.एम., व्ही.एस.एम. आणि सुभेदार मेजर आरके सिंह यांनी सी.डी.एस. कडून प्रशस्तीपत्र स्वीकारले.
यावेळी सशस्त्र दलात सेवेत असलेले आणि सेवानिवृत्त मान्यवर उपस्थित होते. आशियातील कोणत्याही देशाच्या सशस्त्र दलाने स्थापन केलेल्या पहिल्या वैद्यकीय महाविद्यालयांपैकी एक असलेल्या आणि देशातील पहिल्या तीन वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सातत्याने स्थान पटकावलेल्या ए.एफ.एम.सी. ला राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेद्वारे ३.४५ च्या सी.जी.पी.ए. सह ‘अ+’ श्रेणी प्रदान करण्यात आली आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता, प्रिसिजन मेडिसिन आणि टेलीमेडिसिन यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानासह पारंपरिक अध्यापन शिक्षण पद्धतींचा वापर करून, ए.एफ.एम.सी. वैद्यकीय प्रगतीत आघाडीवर आहे, आरोग्य उपचार पद्धतींचा विस्तार करण्यासाठी आणि राष्ट्रीय आणि जागतिक वैद्यकीय नवोन्मेषांमध्ये योगदान देण्यासाठी तंत्रज्ञान अवलंबत आहे.
सशस्त्र दल आणि राष्ट्राच्या आरोग्य उपचार सेवा गरजा पूर्ण करण्यात या वैद्यकीय महाविद्यालयाने वेळोवेळी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. देशाच्या ७५ वर्षांच्या गौरवशाली सेवेसाठी, ए.एफ.एम.सी. ला दि. १ डिसेंबर २०२३ रोजी प्रेसिडेंट्स कलर सन्मानाने गौरवण्यात आले.
महाविद्यालयाद्वारे दिल्या जाणाऱ्या असाधारण बाह्यरुग्ण आणि रुग्णालयातील आरोग्य उपचार सेवांचा वार्षिक १.५ लाखांहून अधिक रूग्ण लाभ घेतात. ए.एफ.एम.सी. द्वारे दत्तक घेतलेल्या कासुर्डी गावात हाती घेतलेले आउटरीच उपक्रम हे समाजाला दर्जेदार प्रतिबंधात्मक, प्रोत्साहनात्मक, निदान आणि उपचारात्मक आरोग्य सेवा देण्याच्या संस्थेच्या वचनबद्धतेची साक्ष आहेत.
समाजाप्रती असलेली ही बांधिलकी अधिक दृढ करून नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी लोकसंख्येसाठी ए.एफ.एम.सी. द्वारे सिकलसेल तपासणी प्रकल्पही हाती घेतला जात आहे. कॉम्प्युटेशनल औषध केंद्र , टेली-मेंटल हेल्थ असिस्टन्स अँड नेटवर्किंग ॲक्रॉस स्टेट (टेली-मानस) कक्ष आणि ए.एफ.एम.सी. येथे नुकतेच सुरू करण्यात आलेल्या एकात्मिक औषध विभागाने आरोग्य सेवा शिक्षण, संशोधन आणि सेवा वितरणासाठी एक नवीन आणि समग्र आयाम जोडला आहे.
यावेळी बोलताना चीफ ऑफ डिफेंस स्टाफ यांनी जनरल नरेंद्र कोतवाल आणि ए.एफ.एम.सी. बिरादरीचे त्यांच्या अनुकरणीय कामगिरीबद्दल आणि सशस्त्र दलातील योगदानाबद्दल अभिनंदन केले.