नियमबाह्य कामे करायला लावण्याच्या संदर्भात अरविंद शिंदे यांच्यावर संघटनांचे आरोप
संविधान ग्रुप व लोकशासन पार्टीचे महापालिका आयुक्तांना पत्र
पुणे (जनमंथन वृत्तसेवा) : ‘माजी नगरसेवक व काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde) हे महापालिकेतील अधिकाऱ्यांना नियमबाह्य कामे करण्यासाठी दबाव आणतात आणि ऐकले नाही की बदली, चौकशीची धमकी देतात. मागासवर्गीय अधिकाऱ्यांना या प्रकारचा त्रास होत असून याची दखल घेऊन अरविंद शिंदे यांच्यावर पालिकेत येण्याबाबत बंधने घालावीत’, अशी मागणी संविधान ग्रुप (Sanvidhan Group) आणि लोकशासन पार्टी ऑफ इंडियाने (Lokshasan party of India) आज महापालिका आयुक्तांना पत्र लिहून केली आहे.
संघटनांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात अशी मागणी केली आहे की, ‘पालिकेतील मागासवर्गीय अधिकाऱ्यांना याचा अधिक त्रास होत असून कोणीही बदल्या करण्याची धमकी देऊन अधिकाऱ्यांवर दबाव टाकणार नाही, याची काळजी आयुक्तांनी घ्यावी. पालिकेचा कारभार सुरळीत चालण्यासाठी योग्य ती कारवाई करावी.’
संविधान ग्रुपचे अध्यक्ष सचिन गजरमल, संस्थापक राकेश सोनवणे, लोकशासन पार्टीचे अध्यक्ष रमेश कोल्हे (Ramesh Kolhe), सुनीता रिठे (Sunita Rete), सागर अडागळे (Sagar Adagale), भागवत कांबळे (Bhagwat Kamble), संदीप बिराजदार (Sandeep Birajdar) यांनी निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (Additional Commissioner Vikas Dhakne) यांच्याकडे आज, दि. ५ जानेवारी रोजी निवेदन देण्यात आले.