पुणे (जनमंथन वृत्तसेवा) : रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब (RWITC) लिमिटेड द्वारे आयोजित सदर्न कमांड गोल्ड कप, ही एक प्रतिष्ठीत घोडदौड स्पर्धा आज शनिवार, दि. ३१ ऑगस्ट २०२४ रोजी संपन्न झाली. सदर्न कमांडचे आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल धीरज सेठ (अति विशिष्ट सेवा पदक विजेते) यांची कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या चुरशीच्या शर्यतीत इम्तियाज सैत यांनी प्रशिक्षित केलेल्या ‘इन्कलाब’ या अश्वाने विजय मिळवला. या अश्वावर जॉकी अक्षय कुमार यांनी घोडेस्वारी केली. विजेत्यांना आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आला. यावेळी विशेष कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल सेठ यांनी रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब (आरडब्ल्यूआयटीसी) लि., पुणे यांची प्रशंसा केली.
सदर्न कमांड सुवर्ण चषक या स्पर्धेला ऐतिहासिक वारसा असून या स्पर्धेची सुरुवात, दि. ४ सप्टेंबर १९४८ रोजी झाली होती. या ऐतिहासिक स्पर्धेने भारतीय रेसिंग इतिहासाचा एक आधारस्तंभ स्थापित केला आहे. दीड मैलाचे आव्हानात्मक अंतर कापण्याची ही शर्यत सुरुवातीला ही स्पर्धा श्रेणी-II आणि III मधील घोड्यांसाठी खुली होती (शर्यती मानकांनुसार घोड्यांची श्रेणी). वर्षानुवर्षे या शर्यतीचा दर्जा वाढत असून १९८६ मध्ये या स्पर्धेला सूचीबद्ध दर्जा प्राप्त झाला तर १९९९ मध्ये श्रेणी ३ गुणवत्ता मिळवून, भारतीय रेसिंग स्पर्धांच्या यादीत या स्पर्धेला मानाचे स्थान प्राप्त झाले आहे.
सदर्न कमांड सुवर्ण चषक ही रेसिंग स्पर्धेचे केवळ आकर्षणच नाही तर भारतीय लष्कर आणि रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लिमिटेड यांच्यातील मजबूत संबंधांचे प्रतीक देखील आहे. ही स्पर्धा भावी पिढ्यांतील टर्फ प्रेमी आणि उत्साही तरुणांना प्रेरणादायी ठरेल.