पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केले सोनालिकाच्या १३०० कोटी रुपयांच्या विस्तारित योजनेचे अनावरण
पंजाबमधील होशियारपूरमध्ये जगातील सर्वांत मोठा एकात्मिक ट्रॅक्टर उत्पादन कारखाना
पुणे (जनमंथन वृत्तसेवा) : भारतातील पहिल्या क्रमांकाचा ट्रॅक्टर निर्यात ब्रॅण्ड सोनालिका ट्रॅक्टर्स पंजाबमधील आघाडीच्या ओईएम्समध्ये गणला जातो. जगातील सर्वांत मोठा ट्रॅक्टर उत्पादन कारखाना सुरू करून या ब्रॅण्डने होशियारपूर शहराचे नाव जगाच्या नकाशात ठळक केले आहे. राज्यात दोन नवीन कारखान्यांच्या पायाभरणीची घोषणा करताना कंपनीला विशेष आनंद होत आहे. यासाठी झालेल्या अनन्यसाधारण सोहळ्याला पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Punjab Chief Minister Bhagwant Mann) उपस्थित होते. गेल्या वर्षाच्या अखेरीस दिलेले नवीन गुंतवणूकीचे वचन पूर्ण करत सोनालिका एक नवीन ट्रॅक्टर (Sonalika Tractor’s) जुळणी कारखाना स्थापन करण्यासाठी १००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे आणि शिवाय नवीन उच्च दाबाची फाउंड्री (धातू ओतण्याचा कारखाना) ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.
सोनालिका समूहाच्या होशियारपूरमधील द्रष्ट्या योजनेचे अनावरण मुख्यमंत्री मान यांच्या हस्ते झाले. राज्याच्या औद्योगिक क्षेत्रासाठी हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. अत्याधुनिक ट्रॅक्टर जुळणी कारखाना हा पूर्णपणे सोनालिका समूहाच्या निर्यातविषयक बांधिलकीची पूर्तता करण्यासाठी स्थापन केला जात आहे. हा कारखाना संपूर्णत: कार्यान्वित झाल्यानंतर कंपनीची वार्षिक क्षमता अतिरिक्त १ लाख ट्रॅक्टर्सने वाढणार आहे. शिवाय, ड्रास ही नवीन अतिप्रगत उच्च दाबाची फाउंड्रीही तयार झाल्यानंतर उत्तर भारतातील सर्वांत मोठा कास्टिंग कारखाना ठरणार आहे. या नवीन कारखान्याची रचना जपानमधील मुरब्बी इंजिनीअर्सनी केली आहे. जपानमधील कठोर उत्पादन मानकांची पूर्तता करून ही रचना केली जात आहे. त्यामुळे अद्वितीय दर्जा आणि कार्यक्षमतेची निश्चिती होऊन सोनालिकाचे कार्यक्षेत्र १५०हून अधिक देशांमध्ये विस्तारले जाणार आहे. जगभरातील सर्वांत मोठ्या एकात्मिक ट्रॅक्टर कारखान्याचे मालक हे कंपनीचे अभिमानास्पद स्थान हा नवीन कारखाना अधिक पक्के करणार आहे.
मुख्यमंत्री मान कार्यक्रमाला उपस्थित राहिले याबद्दल सोनालिका ट्रॅक्टरचे व्हाइस चेअरमन डॉ. अम्रितसागर मित्तलयांनी कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, “सोनालिकाने होशियारपूरमध्ये केलेल्या नवीन गुंतवणूकीमुळे जगातील सर्वांत मोठ्या ट्रॅक्टर उत्पादन कारखान्याचे मालक हे आमचे स्थान अधिक भक्कम करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारने यासाठी अनन्यसाधारण सहाय्य पुरवले आहे. विशेषत: पंजाबमध्ये नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी सरकारने उपलब्ध करून दिलेले एक-खिडकी सहाय्य यात खूप उपयुक्त ठरले आहे. खासगी क्षेत्र आणि सरकार यांच्यातील सहयोगात्मक प्रयत्नांमुळे व्यवसाय वाढ व नवोन्मेषासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे.”
सोनालिका ट्रॅक्टर्सच्या डेव्हलपमेंट अँड कमर्शिअल विभागाचे संचालक अक्षय सांगवान म्हणाले, “हा नवीन कास्टिंग कारखाना वार्षिक १ लाख मेट्रिक टन धातू वितळवण्यासाठी सक्षम असल्यामुळे आमच्या अवजड ट्रॅक्टर श्रेणीला दर्जा व विस्तार या दोन्ही निकषांवर मोठी चालना मिळणार आहे. जर्मन बनावटीच्या अत्याधुनिक कुंकेल वॅग्नर उच्च दाबाच्या मोल्डिंग लाइनने युक्त असा ड्रास उत्तम दर्जाच्या उत्पादनाच्या माध्यमातून ट्रॅक्टर्सचा दर्जा उंचावण्यासाठी सज्ज आहे.”
मुख्यमंत्री मान यांनी सध्या अस्तित्त्वात असेलल्या उत्पादन कारखान्यालाही भेट दिली. हा जगातील सर्वांत मोठा ट्रॅक्टर उत्पादन कारखाना आहे. याच कारखान्याच्या माध्यमातून सोनालिकाने दर २ मिनिटांना नवीन ट्रॅक्टर उत्पादित करण्याची लक्षणीय क्षमता प्राप्त केली आहे. कारखान्यातील कामाकाजाचा आवाका आणि कार्यक्षमता यांची मुख्यमंत्र्यांनी प्रशंसा केली आणि पंजाबच्या औद्योगिक वाढीला चालना देण्यातील सोनालिका समूहाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचीही दखल घेतली.