पुणे (जनमंथन वृत्तसेवा) : खेळ हा आयुष्यातील महत्त्वाचा भाग असून खेळा बरोबरच शिक्षणावर भर देणे आवश्यक आहे. विविध क्षेत्रांमध्ये तसेच प्रशासकीय पदावर कामकाज करताना वाचनाला ही तितकेच महत्त्वाचे स्थान आहे. इंटरनेट, मोबाईल सोडून मुलांनी मातीतील खेळाकडे वळणे अत्यावश्यक आहे. मुलांनी शालेय स्तरावर खेळामध्ये अधिकाधिक सहभागी होऊन विविध प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून खेळ खेळावेत व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी करण्यासाठी वाटचाल करावी. पालक आणि शिक्षण शिक्षक यांनीही खेळास महत्व देऊन मुलांना प्रोत्साहित करावे. त्यामुळे मुलांना भविष्यात खेळामध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्याची व प्रशासकीय सेवेमध्ये कामकाज करण्याची संधी नक्कीच उपलब्ध होईल असे आवाहन अर्जुन पुरस्कार प्राप्त धावपटू ललिता बाबर-भोसले यांनी केले.
राज्यामध्ये दि. १ जानेवारी २०२४ ते १५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियानाची सुरुवात करण्यात आलेली आहे. या कालावधीत राज्यातील शाळांमध्ये गुणवत्ता विषयक उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अनुषंगाने शासनामार्फत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या यूट्यूब चैनलच्या माध्यमातून परिषदेचे संचालक राहुल रेखावर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सेलिब्रिटी टॉक’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत ललिता बाबर-भोसले यांची ऑनलाईन मुलाखत घेण्यात आली. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे येथील उपसंचालक रमाकांत काठमोरे यांनी आयोजन केलेल्या या सेलिब्रिटी टॉक निमित्ताने परिषदेतील सहसंचालक डॉ. शोभा खंदारे यांनी सदर अभियानाचे महत्त्व व शुभेच्छा पर संदेश दिला. आयोजन केलेल्या संवाद सत्राचे प्रास्ताविक व ललिता बाबर-भोसले यांचा परिचय IQC व गणित विभाग प्रमुख मनिषा यादव यांनी करून दिला. आभार चंदन कुलकर्णी व सूत्रसंचालन व मुलाखत वैशाली काकडे यांनी घेतली.