दैनिक जन मंथन चे बीड जिल्हा विशेष प्रतिनिधी एस. एम. युसूफ़ राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित
वसीम खान | जनमंथन वृत्तसेव
बीड : उस्मानाबाद जिल्ह्यातून प्रकाशित होणारे दैनिक ‘प्रभास केसरी’ कडून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी बीड शहरातील हॉटेल अन्विता हॉलमध्ये दैनिकाच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्ताने पुरस्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यात दैनिक ‘जन मंथन’ चे बीड जिल्हा विशेष प्रतिनिधी एस. एम. युसूफ़ यांना राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
एस. एम. युसूफ़ यांना आतापर्यंत चंपावतीरत्न पुरस्कार, मातृभूमी प्रतिष्ठानचा आदर्श पत्रकारिता पुरस्कार, जिज्ञासा सेवाभावी संस्थेचा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, पद्मपाणी प्रतिष्ठान चा राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार, निर्भीड पत्रकार संघाचा आदर्श पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी दैनिक ‘प्रभास केसरी’ या दैनिकाकडून काल दिनांक २१ जुलै २०२४, रविवार रोजी बीड शहरातील हॉटेल अन्विता येथे वृत्तपत्राच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्ताने पुरस्कार समारंभ घेण्यात आला. त्यांनी हा पुरस्कार सपत्नीक स्वीकारला. एस. एम. युसूफ़ यांनी गेल्या दहा वर्षाच्या पत्रकारिता क्षेत्रातील कारकीर्दीमध्ये आतापर्यंत सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आदी विषयांवर १०० च्या वर लेख तसेच हजारो बातम्या लिहिल्या आहेत. आजही त्यांचे कार्य अविरतपणे सुरू आहे. त्यांच्या कार्याची नोंद घेऊन संपादिका प्रा. अनुप्रिता मोरे तथा मार्गदर्शक रमेश लांडगे यांनी त्यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केले. या कार्यक्रमाचे आयोजन दैनिक ‘प्रभास केसरी’ चे बीड जिल्हा प्रतिनिधी अण्णासाहेब साबळे यांनी केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे होते तर ज्येष्ठ शिक्षक नेते उत्तम पवार, दैनिक ‘तामिर’ चे ज्येष्ठ संपादक काज़ी मकबूम, प्रा. डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर, दैनिक ‘समर्थ राजयोग’ चे संपादक वैभव स्वामी, साप्ताहिक ‘शिव वाणी’ च्या संपादिका शेख आयेशा बेगम यांची प्रमुख उपस्थिती होती.