
पुणे/सांगली (जनमंथन वृत्तसेवा) : लष्कराने सांगली येथे पूरग्रस्तांच्या बचाव कार्यासाठी पथक पाठवले आहे. यामध्ये अभियंता कृती दल, पायदळ आणि वैद्यकीय पथकातील सुमारे १०० जवानांचा समावेश असून हे पथक जिल्हाधिकाऱ्यांच्या मागणीनंतर बचाव उपकरणे आणि बोटीसह तैनात करण्यात आले आहे. या पथकाने जिल्हाधिकारी, पोलीस आणि आपत्ती निवारण पथकांसह सर्व संबंधितांबरोबर तातडीच्या बैठका घेतल्या. काल (दि. २७ जुलै) रोजी सकाळी सर्व ठिकाणांची संयुक्त तपासणी करण्यात आली आणि अडकलेल्या लोकांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी पोहचवण्यात आले. पुरस्थितीच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेल्या मदत आणि बचाव कार्यात आवश्यक मदत आणि सहाय्य पुरवण्यासाठी बचाव नौका आणि इतर आरोग्य सेवा सामग्रीसह लष्कराचे पथक तैनात करण्यात आले आहे.