
पिंपरी (जनमंथन वृत्तसेवा) : केंद्र सरकारच्या वतीने आयोजित विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ पिंपरी-चिंचवड शहरात फिरविण्यात आला होता. महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केलेल्या आवाहनास शहरवासियांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून या मोहीमेचा समारोप जूनी सांगवी येथील गजानन महाराज मंदिराजवळील व्यापारी केंद्र येथे करण्यात आला.
पिंपरी-चिंचवड शहरात २८ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर २०२३ अखेर पिंपरी चिंचवड शहरामध्ये ६४ विविध ठिकाणी विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ पोहोचला असून हजारो नागरिकांनी केंद्र शासनाच्या विविध महत्वपुर्ण योजनांची माहिती व लाभ घेतला.
विकसीत भारत संकल्प यात्रेत एकूण ३९ हजार १३४ नागरिकांनी सहभाग घेतला. त्यामध्ये १८ हजार १९७ पुरुष तर २० हजार ९३७ महिलांचा समावेश होता. २ हजार ६८२ नागरिकांनी आधार कार्डचा लाभ घेतला तर ९६०७ जणांनी आरोग्य शिबीरास भेट देऊन त्यातील सुविधांचा लाभ घेतला. ५ हजार ९१० नागरिकांनी आयुष्मान भारत कार्ड केंद्रास भेट दिली तसेच २ हजार ४८७ उज्वला गॅस योजनेचा लाभ घेतला तर पंतप्रधान स्वनिधी केंद्रास ३ हजार ४६४ नागरिकांनी भेट देऊन योजनांचा लाभ घेतला. १० हजार ९६५ नागरिकांनी आत्मनिर्भर भारतासाठी सामुहिक आत्मनिर्भरतेची शपथ घेतली तर केंद्र सरकारच्या योजनांबाबत १५२ जणांनी मेरी कहानी मेरी जुबानी मध्ये सहभाग घेतला आणि योजनांबाबत त्यांची मते व्यक्त केली.
शहरातील या मोहीमेत खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, आमदार उमा खापरे, आण्णा बनसोडे, महेश लांडगे आणि अश्विनी जगताप, माजी नगरसदस्य, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होते तसेच विविध वृत्तवाहिन्यांचे, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.