पुणेशैक्षणिक

इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी वार्षिक परीक्षा व नियतकालिक मूल्यांकन चाचणीची तारीख जाहीर

Spread the love

पुणे (जनमंथन वृत्तसेवा) : राज्यातील राज्य मंडळाचा अभ्यासक्रम असणाऱ्या सर्व मान्यताप्राप्त शाळा, सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी दि. ३ एप्रिल २०२४ रोजी वार्षिक परीक्षा व नियतकालिक मूल्यांकन चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या कार्यालयाने दिली आहे.
याविषयी सविस्तर वृत्त असे की, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दि. ७ डिसेंबर २०२३ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून इयत्ता ५ वी आणि ८ वी साठी वार्षिक परीक्षा घेण्याचे निश्चित केले आहे. या शासन निर्णयानुसार राज्यातील राज्य मंडळाचा अभ्यासक्रम असणाऱ्या सर्व मान्यताप्राप्त शाळांच्या इयत्ता पाचवी आणि आठवी साठी एप्रिल महिन्यात वार्षिक परीक्षा घेण्यात यावी असे निर्देश आहेत. सदर शासन निर्णय हा सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमाच्या शाळांसाठी लागू करणेत आला आहे. या शासन निर्णयानुसार इयत्ता पाचवी व आठवी वार्षिक परीक्षा ही द्वितीय सत्राच्या अभ्यासक्रमावर आधारीत असणार आहे. या वार्षिक परीक्षांसाठी इयत्ता ५ वी ला प्रथम भाषा, द्वितीय भाषा, तृतीय भाषा, गणित, व परिसर अभ्यास हे विषय असतील तर इयत्ता ८ वी ला प्रथम भाषा, द्वितीय भाषा, तृतीय भाषा, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्र हे विषय असतील तसेच इयत्ता पाचवी आणि आठवी साठी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन योजनेतील संकलित मूल्यमापन २ म्हणजेच वार्षिक परीक्षा असणार आहे.
सदर परीक्षेकरिता प्रत्येक शाळांनी शाळास्तरावर प्रश्नपत्रिका तयार करून परीक्षा घेण्यात यावी. शाळांनी प्रश्नपत्रिका विकसन करताना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांनी त्यांच्या maa.ac.in या संकेतस्थळावर इयत्ता पाचवी आणि आठवी वार्षिक परीक्षेसाठी नमुना प्रश्नपत्रिका तसेच संविधान तक्ते उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याचा उपयोग करून प्रश्नपत्रिका तयार कराव्यात असे आवाहन परिषदेच्या वतीने करण्यात येत आहे.
इयत्ता पाचवी व आठवीच्या वार्षिक परीक्षेत विद्यार्थी ज्या विषयात उत्तीर्ण होऊ शकणार नाहीत शाळेमार्फत त्या विषयासाठी अतिरिक्त पूरक मार्गदर्शन प्रदान करून वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून दोन महिन्याच्या आत पुनर्परीक्षा देण्याची संधी देण्यात येईल पुनर्परीक्षाचे आयोजन देखील उपरोल्लेखित शासन निर्णयाप्रमाणे संबंधित शाळांनी करावयाचे आहे. पुनर्परीक्षा घेताना शाळांनी कोणती दक्षता घ्यावयाची याबाबतचे निर्देश संबधित शासन निर्णयात दिलेले आहेत.
नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) शैक्षणिक वर्ष २०२३-२४ या वर्षात राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खाजगी अनुदानित शाळांमधील इयत्ता तिसरी ते आठवी च्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (एकूण १० माध्यम) करिता तीन नियतकालिक मूल्यांकन (PAT) चाचण्यांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यापैकी आतापर्यंत पायाभूत चाचणी व संकलित मूल्यमापन १ चे आयोजन करण्यात आले असून संकलित मूल्यमापन २ चे आयोजन दिनांक २, ३ व ४ एप्रिल २०२४ या कालावधीमध्ये राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खाजगी अनुदानित शाळांमध्ये एकाच वेळी करण्यात येणार आहे.
इयत्ता तिसरी, चौथी, सहावी व सातवी करिता प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा या तीन विषयांकरिता नियतकालीक मुल्यांकन चाचणी हीच संकलित मूल्यमापन २ असेल त्यामुळे या विषयांसाठी स्वतंत्रपणे संकलित मूल्यमापन -२ घेण्यात येणार नाही व उर्वरित विषयांचे संकलित मूल्यमापन – २ शाळांनी त्यांच्या स्तरावर प्रश्नपत्रिका विकसित करून घ्यावयाचे आहे.
इयत्ता पाचवी व आठवीसाठी मात्र नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) ही संकलित मूल्यमापन – २ असणार नाही. या दोन इयत्तांसाठी वार्षिक परीक्षा ही स्वतंत्रपणे घेण्यात येईल त्यामुळे शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळांनी दिनांक २, ३ व ४ एप्रिल २०२४ या कालावधीत नियतकालिक मूल्यांकन चाचणीचे आयोजन निश्चित केले असल्यामुळे सदर चाचणी नंतरच वार्षिक परीक्षेचे आयोजन शाळांनी करावे, असे परिषदेच्या वतीने स्पष्ट करण्यात येत आहे. सर्व शाळांनी वरील सूचनांप्रमाणे आपल्या स्तरावर इयत्ता पाचवी व आठवी च्या वार्षिक परीक्षा शासन निर्णयातील निर्देशाप्रमाणे अंमलबजावणी करून यशस्वीपणे परीक्षा पार पाडाव्यात, यासाठी योग्य ती दक्षता घ्यावी असे आवाहन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे मार्फत करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
×