पुणे (जनमंथन वृत्तसेवा) : ‘ॲग्रो टुरिझम विश्व’ संस्थेच्या वतीने दोन दिवसीय कृषी पर्यटन कार्यशाळेचे आयोजन दि. १६ आणि १७ मार्च २०२४ रोजी करण्यात आले आहे. कृषी व पर्यटन संबंधीत अनुभवी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. त्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदोरे, पर्यावरण अभ्यासक बसवंत विठाबाई बाबाराव, सोशल मीडिया मार्गदर्शक व्यंकटेश कल्याणकर, पराशर कृषी पर्यटन केंद्र चे संस्थापक मनोज हाडवळे, कर सल्लागार अमोल वायभट, गणेश चप्पलवार यांचा समावेश आहे. राज्यातील शेतकरी, कृषी पदवीधर, कृषी उद्योजक, प्रयोगशील शेतकरी, कृषी पत्रकार, तरूण शेतकऱ्यांना व इतर इच्छुकांना व्हावा या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
पराशर कृषी पर्यटन केंद्र (जुन्नर, पुणे) येथे सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत ही कार्यशाळा होईल.दि. १४ मार्च २०२४ पर्यंत ९७३००२३९४६ या संपर्क क्रमांकावर पूर्वनोंदणी करावी असे आवाहन ‘ॲग्रो टुरिझम विश्व’ संस्थेचे संस्थापक गणेश चप्पलवार यांनी केले आहे.
कृषी व ग्रामीण पर्यटन संकल्पना नव्याने रूजू पाहत आहे. ग्रामीण व शहरी संस्कृतीचा संगम कृषी पर्यटनाच्या माध्यमातून होत आहे. गावाला व शेतीला नवी ओळख करून देणारी संकल्पना म्हणून कृषी पर्यटन राज्यासह देशात विस्तारत आहे. या महत्वाच्या शेतीपूरक व्यवसायाची ओळख करून देणारी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रामध्ये कृषी पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळत आहे. देशातील शेतकरी या दोन्ही पर्यटनाला उत्तम शेतीपूरक व्यवसाय म्हणून सकारात्मक दृष्टिने पाहत आहेत. याचा विचार करून कृषी पर्यटन विश्वच्या वतीने या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. भारतात कृषी पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याचा फायदा घेण्यासंबंधी या कार्यशाळॆत मार्गदर्शन करण्यात येईल.
कृषी व ग्रामीण पर्यटनाची गरज व संधी, शासकीय योजना व उपक्रम, परवानग्या व कायदेशीर सल्ला, ग्रामीण व कृषी पर्यटनाचे भविष्य, मार्केटिंग व सोशल मिडिया, कृषी व ग्रामीण आधारित शेती, कृषी पर्यटन धोरण २०२० अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सहभागी होणाऱ्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.