मुंबईमहाराष्ट्रराजकीयराष्ट्रीयसामाजिक
राम मंदिर उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी
मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई (जन मंथन वृत्तसेवा) : सोमवार, दि. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी (Birthplace of Lord Sri Ram) येथे उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात श्री रामलल्लांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून, यादिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा (Minister Mangal Prabhat Lodha) यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना केली आहे.
दिवाळी साजरी करण्याचं एक कारण म्हणजे प्रभू श्रीराम रावणाचा वध करून पुन्हा अयोध्येस परतले होते. आज ५०० वर्षानंतर प्रभू श्रीराम पुन्हा अयोध्येत परतणार हा क्षण म्हणजेच दिवाळी आणि आपल्या राजाच्या स्वागतासाठी हि दिवाळी जल्लोषातच साजरी झाली पाहिजे. त्यासाठीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात सुट्टी जाहीर करण्याचे आवाहन केले आहे.– मंत्री मंगल प्रभात लोढा (कॅबिनेट मंत्री – महाराष्ट्र राज्य व मुंबई उपनगर – पालकमंत्री)
श्रीराम हे अवघ्या भारत देशाचे आराध्य आहेत. अयोध्या येथील मंदिर, हे केवळ मंदिर नसून राष्ट्र मंदिर आहे. त्यामुळे २२ जानेवारी रोजी अयोध्या नगरीत रामलल्लांची प्राणप्रतिष्ठापना होताना महाराष्ट्रात जाहीर सुट्टी असावी, ही सकल हिंदू समाजाची मागणी असून, आपण जनतेच्या मागणीनुसार राज्यात सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी मंत्री लोढा यांनी पत्राद्वारे केली आहे.
तसेच राज्यात सर्वत्र दीपोत्सव साजरा करण्याच्या सूचना देऊन, सार्वजनिक दिपोत्सवासाठी परवानगी द्यावी, अशी विनंती देखील केली आहे.